सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा?www.marathihelp.com

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय?
सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ठ उद्योग संस्था, कुटूंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो.
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत
(१) वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास :
सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो.
उदा. विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूंची किंमत विशिष्ठ उत्पादन इत्यादींचा अभ्यास केला जातो.
(२) किंमत सिद्धांत म्हणून ओळख :
सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या तसेच भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात, याचा अभ्यास केला जातो. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते.
(३) आंशिक समतोलावर भर :
सूक्ष्म अर्थशास्त्रात एक उपभोक्ता किंवा एक उत्पादन संस्था इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे आंशिक समतोलाचे विश्लेषण असते. आंशिक समतोल विश्लेषणात | इतर परिस्थिती कायम असताना | या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते.
(४) विशिष्ट गृहीतकांवर आधारित :
सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते.परंतु वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रातील बहुतांश सिद्धांत हे | इतर परिस्थिती कायम असताना | या गृहीतकावर आधारित आहेत.
(५) विभाजन पद्धतीचा पद्धतीचा वापर :
सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व त्यानंतर प्रत्येक विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे, तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो.
(६) सीमांत तत्त्वाचा वापर :
उपभोक्ता व उत्पादक याद्वारे सीमांत परिणामाच्या तत्त्वानुसार विविध आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्त्वाचा वापर केला जातो.
(७) बाजार रचनांचे विश्लेषण :
पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा इत्यादी बाजारपेठांच्या रचनेचे आणि या बाजारपेठांमध्ये वस्तूंच्या किमती व उत्पादनाचे परिमाण कसे निश्चित होते, याचे सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे स्पष्टीकरण केले जाते.
(८) मर्यादित व्याप्ती :
सूक्ष्म अर्थशास्त्रात बेरोजगारी, भाववाढ किंवा मंदी, दारिद्र्य, व्यवहारतोलातील शेष इत्यादी राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांची चर्चा होत नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे.

सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही किंमत सिद्धांत आणि साधनसामग्रीचे वाटप ही आहे. कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, ते किती प्रमाणात करावे, उत्पादन कुणी करावे, कोणत्या पद्धतीने उत्पादन करावे, उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये विभाजन कसे करावे, साधनसामग्रीचे उत्पादन व उपभोग यांसाठी कार्यक्षम वितरण कसे करावे इत्यादी आर्थिक प्रश्न सोडवण्यावर सूक्ष्म अर्थशास्त्र भर देते.
या अनुषंगाने सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येते
(१) वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत :
सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किंमत निर्धारणाचा अभ्यास केला जातो. वस्तूंच्या व सेवांच्या किमती या त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून ठरतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात मागणी, पुरवठा, उत्पादनखर्च, उत्पादन फलन यांच्या सिद्धांतांचा समावेश होतो.
(२) उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत :
सूक्ष्म अर्थशास्त्रात उत्पादन घटकांच्या किंमत निर्धारणाचाही अभ्यास केला जातो. भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या चार उत्पादन घटकांच्या किमती (मोबदले) म्हणजेच अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून ठरतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात खंड, वेतन, व्याज व नफा यांच्या सिद्धांतांचा समावेश होतो.
(३) आर्थिक कल्याणाचे सिद्धांत :
सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतांचा समावेश होतो. आर्थिक कल्याण हे प्रामुख्याने साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित असते. साधनसामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप असते. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते.
सूक्ष्म अर्थशास्त्रात पुढील आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास केला जातो .
अ) उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता : 
उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे, म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता होय. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे महत्तम उत्पादन कशा प्रकारे घडवून आणता येईल, याचे स्पष्टीकरण करते.
ब) उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता : 
संपूर्ण समाजास जास्तीत जास्त समाधान प्राप्त होईल, अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता होय. सूक्ष्म अर्थशास्त्र महत्तम समाधान कशा प्रकारे प्राप्त होईल याचे स्पष्टीकरण करते.
क) एकूण आर्थिक कार्यक्षमता : 
लोकांना प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता होय. सूक्ष्म अर्थशास्त्र एकूण आर्थिक कार्यक्षमता कशी प्राप्त होईल, याचे स्पष्टीकरण करते.
वरील विवेचनावरून असे दिसून येते की,
सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत किंमत सिद्धांत व साधनसामग्रीचे वाटप यांचा समावेश होतो. म्हणजेच या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणांचा अभ्यास केला जात नाही. या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापारचक्रांचे सिद्धांत, चलनविषयक व राज्यवित्तीय धोरणे इत्यादी घटक या शाखेच्या अभ्यासाच्या कक्षेबाहेर आहेत. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राच्या तुलनेत सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे.

सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा.

(१) किंमत निर्धारण स्पष्टीकरण :
मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात, याचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते.
(२) मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास उपयोगी :
मागणी व पुरवठ्याच्या तत्त्वानुसार मुक्त बाजारपेठीय (भांडवलशाही) अर्थव्यवस्थेचे कार्य कशा प्रकारे चालते, याच्या स्पष्टीकरणासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत उपयोगी ठरतात. सूक्ष्म अर्थशास्त्र कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यांसारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेण्यास वैयक्तिक उत्पादकास उपयुक्त ठरते
(३) विदेशी व्यापारासाठी उपयुक्त :
आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ, विनिमय दराची निश्चिती, जकातींचे परिणाम इत्यादींचे स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्ष्म विश्लेषण उपयुक्त ठरते
(४) आर्थिक प्रारूपांच्या निर्मितीत उपयुक्त :
अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती स्पष्ट करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीत सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. सूक्ष्म अर्थशास्त्रातील अनेक संज्ञा,संकल्पना, आर्थिक परिभाषा, विश्लेषणाची साधने यांनी अर्थशास्त्राला मौलिक स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
(५) उद्योजकांना व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयोग :
किंमत, उत्पादनखर्च, गुंतवणूक, महत्तम उत्पादकता,वस्तूचा भविष्यकालीन मागणीचा अंदाज इ.संबंधी निर्णय घेण्यासाठी उद्योजकांना सूक्ष्म अर्थशास्त्रातील किंमत सिद्धांताचा अभ्यास उपयुक्त ठरतो.
(६) शासनास उपयुक्त :
आर्थिक धोरणे आखण्यासाठी शासनास सूक्ष्म विश्लेषणाचा उपयोग होतो. करविषयक घोरणे, सार्वजनिक खर्चविषयक धोरणे, किंमतविषयक धोरणे, साधनांच्या कार्यक्षम वाटपासंबंधी धोरणे इत्यादी धोरणे आखण्यासाठी सूक्ष्म विश्लेषण शासनास मार्गदर्शन करते.
(७) कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार :
सूक्ष्म अर्थशास्त्रात आर्थिक कल्याणाच्या निकषांची चिकित्सा होते. साधनांचा अपव्यय टाळून महत्तम कल्याणाचे उद्दिष्ट कसे साधता येते, याचे विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते.
अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र हे सैद्धांतिक तसेच व्यावहारिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 16:29 ( 1 year ago) 5 Answer 7248 +22