मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय सविस्तर उत्तरे लिहा?www.marathihelp.com

मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय ?

कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.

मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. मार्क्सच्या पूर्वीसुद्धा समाजसत्तावाद प्रचलित होऊ लागला होता. औद्योगिक क्रांती झाली आणि वाढत्या उद्योगाबरोबर कामगारांची व सामान्य जनतेची परिस्थिती अधिकाधिक हलाखीची बनत गेली. तेव्हा म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात समाजसत्तावादाचा उदय व प्रसार झाला.

त्या वादाचा इंग्‍लंड व फ्रान्समध्ये अनेक नामवंत विद्वानांनी व समाजधुरीणांनी जोरदार पुरस्कार केला. त्या विचारवंतांमध्ये रॉबर्ट ओएन, चार्ल्स फौरिएर, प्रूदाँ, सेंट सायमन वगैरे प्रमूख होते. त्या विचारांना कार्लाइल, डिकन्स, रस्किन आदी लेखकांचाही पाठिंबा होता. या समाजसत्तावादाच्या प्रणेत्यांनी केवळ समाजसत्तावादी समाजाचे भव्य चित्र रेखाटले. तो अस्तित्वात आणण्याचा शास्रशुद्ध मार्ग दाखविला नाही. म्हणून त्यांना यूटोपिअन (अस्थिता दर्शवादी) म्हटले जाते. टॉमस मोर याने सोळाव्या शतकात आपल्या यूटोपिया या पुस्तकात एका आदर्श समाजाचे चित्र रेखाटले, त्यावरून हा शब्द रूढ झाला.


समाजसत्तावाद

मार्क्सने आपल्या पूर्वीच्या समाजसत्तावाद्यांची कल्पनाविश्वात रमणारे म्हणून हेटाळणी केली व त्याची विचारापेक्षा आपला विचार वेगळा आहे, हे दाखवण्यासाठी त्याला शास्रीय वा वैज्ञानिक हे विशेषण लावले. मार्क्सचा विचार वेगळा आहे हे खरे, पण तोच केवळ एक समाजसत्तावादी विचार आहे, अशी जी समजूत करून देण्यात आली ती मुळीच खरी नाही. मार्क्सपूर्व विचारातही समाजसत्तावाद आहेच आणि त्यातील नीती व न्याय यांवरील भर जर मार्क्सवादात अंतर्भूत झाला असता, तर मार्क्सवाद अधिक कल्याणकारक ठरला असता.

मार्क्सवाद एकोणीसाव्या शतकात वाढला. त्याचे पहिले विशदीकरण १८४८ साली प्रसिद्ध झालेल्या साम्यवादी जाहीरनाम्यात (द कम्यूनिस्ट मॅनिफेस्टोत) आढळते. जाहीरनामा मार्क्स व एंगेल्स दोघांनी मिळून लिहीला; पण त्यात मार्क्सचाच अधिक हात होता. या सुमारास भांडवलशाहीचा यूरोपमधील अनेक देशांत विकास होऊन तिची गोड व कटू फळे समाजाच्या पदरात पडू लागली होती; गोड फळे वरिष्ठ वर्गाच्या हाती, तर कडू फळे श्रमजीवी सामान्य जनतेच्या हाती. कामाचा दिवस शक्यतितका वाढवून आपल्या मर्जीनुसार कामवर लावलेल्या मजूराला पगार देणे व आपला नफा वाढवणे हे भांडवलदारांचे धोरण होते.

या व्यवस्थेविरुद्ध कामगारांमध्ये तीव्र असंतोष मजला होता. तो असंतोष फुलवून त्याचे क्रांतिकारक उठावात रूपांतर करता येईल, अशी मार्क्सची, त्याच्या मित्रांची व इतर समाजवाद्यांची कल्पना होती. १८४८ हे युरोमधील क्रांतीचे वर्ष. त्यावर्षी यूरोपमधील अनेक देशांत क्रांतीकारक उठाव झाले. त्या उठांवात सामील होण्याचे आवाहन साम्यवादी जाहीरनाम्याने कामगारांना केले. जाहीरनामाच्या शेवटी मार्क्स लिहीतो, “जगातील कामगारांनो, एक व्हा; शृंखलांखेरीज तुमच्या जवळ गमावण्यासारखे असे दुसरे काही नाही.” जाहीरनामा मार्क्सने पूर्व वयात लिहिला असला, तरी मार्क्सवाद म्हणून नंतर प्रसिद्धी पावलेल्या विचारप्रणालीची सर्व प्रमूख तत्त्व त्याच्यामध्ये दृष्टीस पडतात.

उत्तर वयात त्या तत्त्वांचा परिपोष करणारी मार्क्सने अनेक विद्वत्ता प्रचुर पुस्तके व पुस्तिका लिहिल्या. त्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तो तीन खंडी कॅपिटल हा ग्रंथ. फर्स्ट इंटरनॅशनलने (इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशनने) कॅपिटल ग्रंथ कामगार वर्गाचे बायबल म्हणून गौरविला. पहिला खंड मार्क्सच्या आयुष्यात १८६७ या वर्षी प्रसिद्ध झाला. पुढचे दोन खंड त्याच्य मृत्यूनंतर एंगेल्सने प्रसिद्ध केले. या ग्रंथात भांडवलशाहीच्या उत्पत्तीचा व विकासाचा शास्रशुद्ध अभ्यास असून तिच्या अंगभूत गुणधर्माप्रमाणे ती कामगारांचे वाढते शोषण कसे करते व त्यामुळे इतिहासक्रमानुसार येणाऱ्या पुढच्या अवस्थेला म्हणजे क्रांतीला समाज कसा तयार होतो, ते दाखवले आहे.

याखेरीज अनेक महत्त्वाची लहानमोठी पुस्तके व पुस्तिका त्याने व त्याचा सहकारी मित्र फ्रीड्रिख एंगेल्स (१८२०–१८९५) याने साम्यवाद व तत्संबंधी विषयांवर लिहिली. याखेरीज त्याचे त्या त्या प्रसंगांना धरून लेख, पुस्तीका व पत्रव्यवहार आहे. यामध्ये एंगेल्सच्या पुस्तकांचाही समावेश होतो; कारण मार्क्सवादाच्या उभारणीत मार्क्सइतकाच त्याचाही हात होताच. हे सर्व लिखाण मूळ जर्मनमध्ये लिहिले गेले. फ्रेंच आणि इंग्रजीमध्ये त्याची भाषांतरे झाली. जगातील सर्व प्रमूख भाषांमध्येही त्याचे अनुवाद प्रसिद्ध झाले.

मार्क्सवाद रशियन बोल्शेविक क्रांती झाल्यानंतर सबंध जगभर पसरला आहे. ज्या देशांत मार्क्सवादी क्रांती झाली, तिथे म्हणजे सोव्हिएट युनियन, पूर्व यूरोपियन साम्यवादी राष्ट्रे, चीन आणि क्यूबा येथे त्याला सर्वश्रेष्ठ धर्माची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तिथे मार्क्सवादावर टीका करणे अगर त्याच्यातील उणिवा दाखवून देणे राज्यविरोधी वा समाजविघातक कृत्य समजले जाते. मार्क्सवादाचा केल्याखेरीज तिथे कुणालाही राजकारणात किंवा समाजकारणात स्थान लाभत नाही. सर्व साम्यवादी देशांत आज ही परिस्थिती आहे.

साम्यवादी देशांत व पक्षात मार्क्सवादाचा अभ्यास चालू आहे. तो श्रद्धेने, भावभक्तीने आणि कडक शिस्तीखाली. पण इतरत्र म्हणजे भांडवलशाही जगातही अर्थशास्रज्ञ, तत्त्ववेत्ते, वैज्ञानिक व राजकरणी यांच्यामध्ये मार्क्सवादाचा अभ्यास चालू आहे. सर्वांना तो पटतोच असे नाही, काहींना त्याच्यामध्ये मानवी जीवनाचा आदर्श दिसतो व प्रेरणा मिळते, काहींना त्याची मूळ भूमिका व दृष्टी विपर्यस्त आहे असे वाटते, काहींना त्याचे विवेचन व सिध्दांत बिनबुडाचे आहेत असे आढळते.


युक्तिवाद

तर काहींना मार्क्सने हेटाळणी केलेला कल्पनाजगातील आदर्शवाद वा यूटोपिआ पुन्हा मार्क्सवादामध्ये निराळ्या युक्तिवादावर आधारलेला-अवतरलेला आहे असे दिसते. अशा तऱ्हेची अनुकूल वा प्रतिकुल व अर्धवट अनुकूल व प्रतिकुल टीका आज मार्क्सवादावर काही थोडे साम्यवादी देश सोडले, तर संबंध जगभर चालू आहे. शंभरदीडशे वर्षे होऊन गेली, तरी मार्क्सवादाबद्दलचे कुतूहल संपले नाही, हे एक त्याचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. कारण जगाच्या राजकारणात त्याला वैशिष्ट्यपूर्णस्थान प्राप्त झाले आहे.

मार्क्सवादाचे अनेक पैलू आहेत, त्यापैकी आर्थिक व राजकिय अधिक गाजले, तरी मूलभूत आहे तो तत्त्वज्ञान हा त्याच्या अभ्यासाचा मूळ विषय. अर्थकारणाला व राजकारणाला तात्त्वीक बैठक हवी, असा त्याचा आग्रह होता. त्याने जी बैठक सुचविली ती भौतीकवादाची. मार्क्स हा हेगेलचा उत्तम अभ्यासक होता. त्याचा विरोध-विकासवाद त्याला पटला; पण हेगेलच्या विचारमंथनाचा मूळ पाया जो केवळ तत्त्वचैतन्यवाद वा भाववाद, तो त्याला पटला नाही. केवळ चैतन्य मूळ नसून भूत वस्तू किंवा जड द्रव्य (मॅटर) मूळ आहे,

असा त्याचा आग्रह होता. ही भूत वस्तू स्थिर व स्थाणू नसून ती सतत बदलणारी, सदैव गतिमान असते. या वस्तूंच्या व्यापारातून वा विरोध-विकासातून विश्व निर्माण होऊन प्रणी व नंतर मनुष्य निर्माण झाला, मनुष्यांनी समाज निर्माण केला. भौतीक जीवनाची भौतीक साधने निर्माण करीतच मनुष्य जगतो; निर्माणपद्धती जशी असते तसे विशिष्ट सामाजिक संबंध निर्माण होतात. उत्पादनपद्धती बदलते त्याबरोबर सामाजिक संबंध बदलतात; म्हणजे समाजिक वर्ग बदलतात. उत्पादनपद्धती व सामाजिक विशिष्ट संबंध हा भौतिक सामाजिक पाया; हा पाया जसा असेल त्या प्रकारच्या मानसिक संस्कृतीचा इमला उभारला जातो; कायदा राज्यव्यवस्था, काव्य कला, साहित्य, धर्म इ. मानसिक संस्कृतीत समाज आदी अवस्थेपासून अनेक रूपांतरे होत बदलत गेला आहे.



मार्क्सची तत्त्वज्ञाबद्दलची भूमीका

समाज मनुष्यनिर्मित असल्याकारणाने योग्य ऐतिहासिक परिस्थितीत मनुध्ये तो बदलू शकतात. म्हणून योग्य परिस्थिती निर्माण करून कामगारवर्ग भांडवलशाहीतून समाजसत्तावादी समाज निर्माण करू शकतील, असा हा सर्वसाधारणपणे मार्क्सचा भौतिकवादी, कार्यशिलतेवर भर देणारा, तात्त्विक दृष्टिकोन आहे. मार्क्सवादाचे अर्थकारण व राजकारण यांना तो पायाभृत आहे. आतापर्यंत तत्त्वज्ञांनी केवळ, जग समजावून घेण्याचा प्रयत्‍न केला; आपली जबाबदारी जग बदलणे ही आहे; ही मार्क्सची तत्त्वज्ञाबद्दलची भूमीका होती. समाजव्यवस्था बदलत असते आणि हा बदल उत्पादनसाधने. उत्पादनपद्धती व त्या पद्धतींत निर्माण झालेले सामाजिक संबंध यांच्या बदलांमुळे घडून येतो; हा मूळ सिद्धांत होय; यालाच ऐतिहासिक भौतिकवाद (हिस्टॉरिकल मटीरिअलिझम) असे म्हणतात. इतिहास घडतो व बदलतो तो भौतीक कारणांमुळे; आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, वस्तूंच्या उत्पादनाची व विनिमयाची साधने व पद्धती बदलल्यामुळे. त्यांमध्ये परमेश्वरी योजना नसते किंवा महान व्यक्तींचे कर्तृत्वही महत्त्वाचे नसते. या सिद्धांतानुसार मार्क्सने त्याच्या काळापर्यंतच्या मानवेतिहासाची संगतीही स्थूलमानाने लावून दाखविली.

अगदी सुरूवातीला जीवनार्थ मनुष्यप्राणी टोळ्या करून भटकत होता. नंतर तो स्थिर समाज बनवून एका ठिकाणी राहू लागला. या काळात वर्गविरहित समताप्रधान समाजव्यवस्था रूढ होती. कारण त्यात सर्व संपत्ती सार्वजनिक होती; तिला मार्क्सने प्राथमिक साम्यवाद (प्रिमिटिव्ह कम्युनिझम) असे नाव दिले आहे. त्यानंतर खाजगी संपत्ती निर्माण होऊ लागली, त्याबरोबर आर्थिक वर्ग निर्माण होऊ लागले; वर्गकलहासही लगेच प्रारंभ झाला. त्यानंतरचा आतापर्यंत जो मानवी समाजाचा इतिहास घडत आला; तो वर्गकलहाचा इतिहास होय. याचे मुख्य उदाहरण यूरोपचा प्राचीन काळापासूनचा इतिहास होय. शेती व कुटीरोद्योग सुरू झाले; खाजगी संपत्ती निर्माण झाली; श्रमिकदासवर्ग तयार झाला; या अवस्थेत उत्पादन बव्हंशी गुलामांकडून करवून घेतलं जात असे. समाजात शांतता स्थापण्याकरिता राज्यसंस्था आली. शेती खाजगी मालकीची झाली; व्यापार वाढला, जमीन हेच त्या काळात उत्पादनाचे सर्वांत प्रमुख साधन होते.

जमिनीचे मालक सत्ताधीश झाले आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली सरंजामशाही वाढली; राजसत्ता बळकट झाली. लाखो शेतमजूर शेतावर काम करत होते. त्यांना मालकीमध्ये भाग नव्हता व मजुरी केवळ पोटापुरती मिळत असे. सरंजामशाहीत व्यापारी वर्ग तयार झाला. महानद्या व सागर यांच्यातून वाहतूक व व्यापार सुरू झाला; व्यापारी वर्ग निर्माण झाला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्पादनसाधनांत तंत्रविज्ञानातील शोधामुळे अभूतपूर्व औद्योगिक क्रांती झाली. व्यापारी भांडवलाचे यंत्रोद्योगाच्या भांडवलात रूपांतर झाले. वाफेच्या शक्तीवर चालणारी अनेक यंत्रे निर्मांण झाली. त्या यंत्रांवर ज्यांनी आपली मालकी प्रस्थापित केली ते समाजामध्ये सत्ताधारी झाले. तेच आजचे भांडवलदार. त्यांनी राजारजवाडे आणि जमीनदार यांना सत्ताभ्रष्ट करकून त्या जागी आपले राज्य प्रस्थापित केले, ही भांडवलशाही क्रांती.

ती वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या वेळी घडून येते. पण इतिहास इथेच थांबला नाही. तो पुढे चाललेला आहे. भांडवलशाहीच्या अंगभूत नियमांनुसार कामगार वर्ग मोठा प्रबळ बनतो; भांडवलदारांना समाजाच्या गरजेस पुरेस उत्पादन वाढवता येत नाही अशी स्थिती उत्पन्न होते, तेव्हा भांडवलशाही उत्पादन-पद्धत समाजाच्या प्रगतीच्या मार्गातील घोंड ठरते व मग कामगारांच्या नेतृत्वाखाली क्रांती होते; राजकीय सत्ता कामगारवर्ग काबीज करतो; लुबाडणारे लुबाडले जातात; समाजवादी क्रांती घडून येते. वर्गहीन समाज अस्तित्वात येतो. राज्यसंस्थेची गरज हळूहळू संपते; राज्यसंस्था सुकत जाऊन गळून पडते. तात्पर्य, इतिहासाच्या शक्तीमुळे विकासाच्या नियमानुसार समाजवाद स्थापन होणे अटळ आहे; असा मार्क्सवादाचा अंतिम निष्कर्ष आहे.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 5665 +22