पौगंडावस्थेतील वय किती आहे?www.marathihelp.com

पौगंडावस्थेतील वय किती आहे?

जागतिक आरोग्य संघटनेनं पौगंडावस्थची व्याख्या दोनप्रकारे केली आहे. एक वयानुसार (10 ते 19 वर्षांदरम्यानचा काळ) आणि दुसरी विशिष्ठ गुणधर्म असलेल्या जीवनाच्या टप्प्यानुसार. या गुणधर्मांमधे पुढील समाविष्ट आहेतः

1. जलद शारीरिक वाढ आणि विकास
2. शारीरिक, सामाजिक, मानसिक परिपक्वता (सर्व एकाचवेळी नाही)
3. लैंगिक परिपक्वता आणि लैंगिक क्रिया
4. प्रायोगिकता
5. प्रौढ मानसिक प्रक्रियांचा विकास आणि प्रौढत्वाची ओळख
6. सामाजिक आर्थिक परावलंबनातून सापेक्ष स्वावलंबनात स्थित्यंतर


माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून (त्याही आधी गर्भधारणेपासून) सुरू असले तरी त्यांच्या भ्रूण, बाळ/नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध, इत्यादी अनेक टप्प्यांपैकी दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या संक्रमणाच्या कालखंडाला किशोरवय म्हणतात. या कालखंडात अपरिपक्व मुलाचे (कुमाराचे) पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व मानसिक-सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ तरुणात रूपांतर होते. याच वयात होणाऱ्या माणसाच्या लैंगिक वाढ व विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था म्हणतात.

पौगंडावस्था (Puberty[१]) हा लैंगिक संक्रमणाचा कालखंड आहे. सर्वसाधारणपणे मुलीत या कालखंडाची सुरुवात वयाच्या 10 ते 11व्या वर्षी होते आणि 15 ते 17व्या वर्षापर्यंत लैंगिक विकास पूर्ण होऊन हा कालखंड संपतो. वयाच्या 12 ते 13व्या वर्षी पहिली [मासिक पाळी] येणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा होय. मुलात या कालखंडाची सुरुवात थोडी उशीरा, वयाच्या 11 ते 12व्या वर्षी होते आणि 16 ते 18व्या वर्षापर्यंत हा कालखंड संपतो. त्यामधे वयाच्या 13व्या वर्षाच्या सुमाराला पहिले वीर्यस्खलन होणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा आहे.

मेंदूकडून प्रजनन ग्रंथींकडे विशिष्ट वयात येणाऱ्या संप्रेरकांच्या स्वरूपातील संदेशांमुळे पौगंडावस्थेची सुरुवात होते. या संदेशांमुळे मुलामधे वृषणाची आणि मुलीमधे बीजांडकोषाची वाढ होते. मुलामधे वृषणातून टेस्टोस्टेरॉन व मुलीमधे बीजांडकोषातून ईस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या अंतःस्रावांची निर्मिती सुरू होते. त्यांच्या प्रभावामुळे मुलात शुक्रजंतू व वीर्य निर्मिती आणि मुलीत स्त्रीबीज निर्मिती व मासिक पाळी सुरू होणे ही लैंगिक कार्ये सुरू होतात. मुलामधे शिश्नाची व मुलीमधे गर्भाशय व योनीमार्गाची वाढ होते. त्याचबरोबर फार शारीरिक फरक नसलेल्या मुलात मुलगा व मुलगी असे स्पष्ट बाह्य भेद दाखवणारी, बाह्य जननेंद्रियांवर केस उगवणे, मुलाचा आवाज फुटणे, दाढी-मिशा उगवणे, इत्यादी आणि मुलीमधे स्तनांची वाढ होणे, शरीराला गोलवा येणे, इत्यादी चिन्हेही दिसू लागतात. त्यांना दुय्यम लैंगिक चिन्हे असे म्हणतात.

हे सर्व होत असतानाच, लैंगिक जाणीवा विकसित होणे, लैंगिक भावना मनात येणे, लैंगिक आकर्षण निर्माण होणे, असे मानसिक आणि वैचारिक बदलही होत असतात.

या सर्वांचा परिणाम म्हणून या टप्प्याच्या शेवटी मुलगा आणि मुलगी अनुक्रमे पुरुष आणि स्त्रीमधे लैंगिकदृष्ट्या विकसित होऊन प्रजननक्षम बनतात.

इंग्रजीत प्युबर्टी (Puberty) हा शब्द लॅटीनमधील "प्युबेस' या शब्दावरून आला आहे. प्युबेस म्हणजे जननेंद्रियावरील केस. हे केस उगवू लागले की व्यक्ती वयात आली असं पूर्वी मानण्यात येत असे.

किशोरवय हा मुख्यतः मानसिक-सामाजिक परिपक्वतेचा काळ आहे. पौगंडावस्था आणि किशोरवय हे दोन्ही कालखंड काही काळ एकमेकांबरोबर समांतर जात असले तरी किशोरवयाचा वैशिष्ट्यपूर्ण कालखंड जास्त पसरट असून त्याची व्याप्ती शारीरिक-बौद्धिक-मानसिक-समाजिक अशी सर्वसमावेशक आहे. त्यातील बौद्धिक-मानसिक-समाजिक परिपक्वतेची प्रक्रिया पुढे तारुण्यात व प्रौढावस्थेतही चालू राहाते. पौगंडावस्था हा त्यातील फक्त लैंगिक संक्रमणाचा कालखंड असून लैंगिक विकास पूर्ण होऊन प्रजननक्षमता आल्यावर तो संपतो.


किशोरवय

किशोरवय हा संक्रमणाचा कालखंड साधारणपणे पौगंडावस्थेच्या थोडा आधी सुरू होतो व माणसाचे पूर्ण विकसित प्रौढ व्यक्तीत रूपांतर झाल्यावर संपतो. त्यामधे माणसाच्या शारीरिक व लैंगिक विकासाबरोबरच मानसिक, बौद्धिक व सामाजिक असा सर्वसमावेशक विकास होतो. या सर्व प्रक्रिया थोड्या पुढे-मागे सुरू होतात व संपतात. सर्वसामान्यपणे दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या कालखंडाला किशोरावस्था मानण्यात येते. मुलींत हा कालखंड मुलांपेक्षा आधी सुरू होऊन आधी संपतो. मुलाची सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक परीस्थिती, पोषण, भोवतालचे वातावरण, त्या ठिकाणची प्राकृतिक-सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्ये इत्यादींवर तो अवलंबून असतो.
किशोरवयात मुलांमधे (मुलगे व मुली) होणारे बदल

शारीरिक बदल: पूर्णत्वाकडे जाणारी सर्वसाधारण शारीरिक वाढ आणि निरनिराळ्या सर्व अवयवांचा परिपक्वता आणि प्रौढत्वाकडे होणारा विकास या प्रकारे या वयात शारीरिक बदल होतात. शरीरातील सर्वच अंतःस्रावी ग्रंथींचा विकास थोडा आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यांतील लैंगिक अंतःस्रावांच्या प्रभावामुळे मुख्य (प्राथमिक) व दुय्यम लैंगिक अवयवांची वाढ होते व बाह्यतः दुय्यम लैंगिक चिन्हे दिसू लागतात.

मानसिक–भावनिक बदल: या वयात अनेक गोष्टींचा आणि अनुभवांचा परिणाम म्हणून मुलांचा (मुलगा-मुलगी दोघांचाही) एका किंवा अनेक प्रकारच्या लैंगिक वृत्तीच्या व्यख्तींकडे असणारी लैंगिक अभिमुखता (कल)[२] ठरत असतो. त्यांना अनेक गोष्टींचे आकर्षण वाटते. (सर्वसाधारणपणे) भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण (लैंगिक कल असेल त्याप्रमाणे) तर असतेच. त्याचबरोबर त्यांना बाह्य जननेंद्रियांचे व त्यांच्या कार्याचे आणि भिन्नलिंगी व्यक्तींचे कुतूहल असते. त्यांना बाह्य जननेंद्रियांचा वापर करून बघण्याचीही तीव्र इच्छा – कामेच्छा – निर्माण होते. शिवाय त्यामागे प्रजननाची नैसर्गिक अंतःप्रेरणाही असते.

किशोरवयातील मुलांच्या इतरही अनेक कल्पना, संकल्पना, विचार व भावना बदलत व हळूहळू स्थिरावत असतात. मुलाच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर या गोष्टी परिणाम करतात.

बौद्धिक बदल: या वयात अधिमस्तिष्काचा व त्याच्या कार्यपद्धतीचा विकास होतो. या वयातील वैशिष्ट्यपूर्ण मानसिकता; विचारांची व वागण्याची पद्धत; संकल्पना व कल्पना; अमूर्त विचार, नवनिर्मिती क्षमता हे या बौद्धिक बदलांचेच परिणाम म्हणता येतील[३].

सामाजिक बदल: स्वतःची ओळख; स्वतःचे स्थान; स्वतःच्या प्रतिमेचा (स्व-संकल्पना[४] – मला कसे आणि कोण व्हायचे आहे) विचार व विकास (व्यक्तिमत्त्व विकास[५]); आत्मसन्मानाची[६] जाणीव; वाढते सामाजिक संबंध व सामाजिक वर्तन आणि कुटुंबात व समाजात आपली विशिष्ट ओळख व स्थान निर्माण करणे या प्रकारे हे सामाजिक बदल होत असतात.

वाढत्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतांचा वापर करून बघणे ही वृत्ती या वयात प्रामुख्याने दिसते. या वृत्तीप्रमाणे वर्तन करताना त्यामागच्या विधायक किंवा विघातक विचारांमुळे मुलांचे प्रत्यक्ष सामाजिक वर्तन बदलते आणि ते संस्कारांवर अवलंबून असते.
पौगंडावस्था

किशोरवयातील लैंगिक विकासाच्या कालावधीला पौगंडावस्था (Puberty) असे म्हणतात. मेंदूमधून विशिष्ट वयात येणाऱ्या संदेशांनुसार उत्तेजित झालेल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या नियंत्रणाखाली हा लैंगिक गुणधर्मांचा व लैंगिक अवयवांचा विकास होतो व व्यक्ती प्रजननक्षम झाल्यावर तो संपतो. या कार्यांत प्रत्यक्ष सहभागी मुख्य लैंगिक अवयवांना प्राथमिक लैंगिक गुणधर्म असे म्हणतात. याशिवाय या वयात मुलगा किंवा मुलगी सहजपणे ओळखता येईल अशी काही चिन्हे शरीरावर विकसित होतात त्यांना दुय्यम लैंगिक चिन्हे असे म्हणतात. ती प्रत्यक्ष प्रजननसंस्थेचा भाग नसतात पण ती लैंगिक कार्यात अप्रत्यक्षपणे सहभागी असतात. ही चिन्हे सक्षमता, वैशिष्ट्य व प्रजननक्षमता दर्शवतात आणि त्यांचा उपयोग जोडीदाराची निवड करताना होतो असे समजले जाते.

मुलाच्या लैंगिक विकासापेक्षा मुलीचा लैंगिक विकास वेगळ्या पद्धतीने होतो.
मुलांची लैंगिक वाढ व विकास
मुख्य लैंगिक अवयवांची वाढ व विकास
वृषण

1 वर्षे वयाच्या मुलाचे वृषण 2-3 सेंमी लांब आणि 1.5-2 सेंमी रुंद असतात व त्यांच्या आकारात पौगंडावस्था सुरू होईपर्यंत बदल होत नाही. पौगंडावस्था सुरू होताना पोष ग्रंथीकडून येणाऱ्या संदेशांमुळे वृषणांची वाढ व विकास सुरू होतो. हे पौगंडावस्था सुरू होण्याचे मुलांमधील पहिले बाह्य शारीरिक लक्षण असते. त्यानंतर साधारण 6 वर्षांनंतर त्यांची वाढ पूर्ण (सरासरी 5 x 2 x 3 सेंमी) होते. शुक्रजंतू तयार करणे आणि टेस्टोस्टेरॉन हे पुरुष-संप्रेरक निर्माण करणे ही वृषणाची दोन मुख्य कार्ये आहेत.

पौगंडावस्थेतील नंतरचे बरेचसे बदल ’टेस्टोस्टेरॉनच्या’ प्रभावामुळे होतात. टेस्टोस्टेरॉनमुळे प्रोस्टेट आणि सेमिनल व्हेसिकल्स (शुक्राशय) या वीर्यनिर्मिती करणाऱ्या ग्रंथींचाही विकास होतो आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवले जाते.

वाढ झालेल्या वृषणाचा बराचसा भाग शुक्रजंतू निर्माण करणाऱ्या ऊतीने भरलेला असतो. पौगंडावस्था सुरू झाल्यानंतर साधारण एक वर्षानंतर मुलच्या लघवीत शुक्रजंतू आढळू लागतात. यामुळे 13व्या वर्षांच्या सुमारास मुलात प्रजननक्षमता येते. पण पूर्ण प्रजननक्षमता 14-16 वर्षे वयापर्यंत येत नाही.
बाह्य जननेंद्रीय – शिश्न

हे समागमाचे पुरुष इंद्रिय आहे. वृषणाची वाढ व विकास सुरू होऊन साधारण एक वर्ष झाल्यावर टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावामुळे शिश्नाची लांबी व नंतर रुंदी वाढू लागते. याबरोबरच शिश्नमणी आणि स्पंजसारख्या ऊतीने बनलेल्या दंडगोलाकृती पोकळ्या (corpora cavernosa)[७] यांचीही वाढ सुरू होते. शिश्नाची वाढ 17 वर्षांपर्यंत पूर्ण होते.

अग्रत्वचा मागे सरकणे: पौगंडावस्थेत अग्रत्वचेचे पुढचे भोक मोठे होऊ लागते. तिचा आतील पृष्ठभाग शिश्नमण्याला जोडणाऱ्या पापुद्र्याचा हळूहळू ऱ्हास होत जातो. त्यामुळे अग्रत्वचा शिश्नमण्यापासून सुटी होऊन ती शिश्नावरून आणि शिश्नमण्यामागेपर्यंत सरकणे जास्त जास्त सुलभ होऊ लागते. पुढे समागम करताना त्रास होऊ नये म्हणून हे आवश्यक असते. तसेच शिश्नाचा आकार ताठरल्यावर मोठा झाला तरी शिश्नास सामावून घेण्याइतकी शिश्नावरील त्वचा सैल असते. पौगंडावस्थेच्या सुरुवातीनंतर अग्रत्वचा शिश्नमण्यामागेपर्यंत सरकू शकणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढत जाऊन 16-17 वर्षांपर्यत 95% मुलांना ते शक्य होते. उरलेल्यांपैकी काहींना निरूद्धमणी (अग्रत्वचेचे पुढचे भोक आकुंचित राहिल्यामुळे ती शिस्नाग्रावरून मागे न सरकणे - Phimosis) या समस्येला सामोरे जावे लागते.

अग्रत्वचा मागे सरकायला लागल्यानंतर तिचा आतील पृष्ठभाग व शिश्नमणी यांची पाण्याने धुऊन स्वच्छता करणे शक्य होते व रोज स्नानाच्यावेळी ती करणे व लघवी करताना अग्रत्वचा मागे सरकवणे आवश्यक आहे. त्यामुळे शिश्नाच्या अनेक आजारांना प्रतिबंध होतो.

शिश्न ताठरणे: शिश्नातील दंडगोलाकृती पोकळ्यांमधील स्पंजसारख्या उतींमध्ये रक्त साठून राहिले म्हणजे शिश्न ताठ होते. झोपेत, जागे होताना किंवा दिवसभरात केव्हाही सहजच विनाकारण शिश्न ताठरणे नैसर्गिक असते. हे नवजात बालकापासून प्रौढांपर्यंत सर्वांत आढळते. पण पौगंडावस्थेत हे होण्याचे प्रमाण वाढून शिश्न ताठरणे वारंवार होऊ लागते. रात्री झोपेत ते ताठरल्याने जाग येते व काही वेळा अचानक वीर्यस्खलन होते. याला बोली भाषेत स्वप्नावस्था येणे किंवा स्वप्नदोष असे म्हणतात. पण हा दोष नसून हे नैसर्गिक आहे. परंतु यामुळे व दिवसा काम करताना, समाजात वावरताना शिश्न ताठरल्यास लाज वाटून बेचैनी येते. हे नैसर्गिक आहे हे न समजल्यास त्याचे मानसिक परिणाम होऊ शकतात. 

हस्तमैथुन: या वयात होंणारी लैंगिक अवयवांची वाढ, वाढती लैंगिक जाणीव, मुलांचे शिश्न वारंवार ताठणे व स्वप्नावस्थेचा अनुभव आणि या वयातील वाढते कुतूहल यांचा परिणाम म्हणून मुलगा व मुलगी दोघांतही लैंगिक अवयव हाताळून बघण्याची इच्छा निर्माण होते. या हाताळणीचा अनुभव सुखद आल्याने वारंवार हस्तमैथुन करण्यची प्रवृत्ती वाढते. पण गोपनीयता, अज्ञान, चुकीची माहिती किंवा सामाजिक बंधनांमुळे अपराधभावना किंवा काहीतरी चुकीचे करत असल्याची भावना निर्माण होते. हस्तमैथुन करणे नैसर्गिक आहे हे न समजल्यास त्याचे मानसिक परिणाम होऊ शकतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 4353 +22