पानिपतच्या लढाईचे काय परिणाम झाले?www.marathihelp.com

पानिपतच्या लढाईचे काय परिणाम झाले?

पानिपतची तिसरी लढाई ही केवळ मराठ्यांच्याच इतिहासावर परिणाम घडवून आणणारी घटना नसून त्याचे परिणाम संपुर्ण हिंदुस्थानच्या इतिहासावर पडलेले दिसून येतात.यातून मराठ्यांच्या सत्तेला जबरदस्त हादरा बसला.महाराष्ट्रातील सत्ता समीकरणात मोठा बदल घडून आला.त्याचप्रमाणे उत्तर हिंदूस्थानात देखील अनेक सत्ता परिवर्तने घडून येण्यास सुरूवात झाली.

पानिपतच्या तिस-या लढाईचे परिणाम खालीप्रमाणे :

१) प्रचंड मनुष्यहानी : पानिपतच्या तिस-या लढाईत प्रचंड जिवितहानी झाली.पानिपतच्या तिस-या युद्धात मराठ्यांचे प्रचंड सैन्य मारले गेले.महाराष्ट्रामधील एक कर्ती पिढी पुर्णपणे नष्ट झाली.संपुर्ण महाराष्ट्र भर दु:खाची छाया पसरली.पानिपतच्या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून एकतरी माणूस मारला गेला होता.

२) संपत्तीची हानी : या युद्धात प्रचंड संपत्ती अब्दालीने लूटून नेली.घोडदळ व पायदळाची हानी झाली.रज्याची तिजोरी खाली झाली.मराठ्यांना त्यामुळे चणचण भासू लागली.पुढे मराठ्यांची ही तूट कधीच भरून काढता आली नाही.

३) मराठा सत्तेस हादरा : पानिपतच्या लढाईतील पराभवामुळे मराठ्यांच्या राजकीय सत्तेस फार मोठा धक्का बसला.तसेच मराठा सत्तेच्या भवितव्यावरही आघात झाला.मराठा सत्ता खिळखिळी बनली.उत्तर हिंदुस्थानातील मराठ्यांचा राजकीय प्रभाव संपला.

४) नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू : एकेकाळी अटकेपार झेंडा फडकविणा-या मराठ्यांना पानिपतच्या लढाईत पराभूत व्हावे लागले.याचे दू:ख व अपमान नानासाहेब पेशव्यांना सहन झाले नाही.त्याच्या जवळचे सहकारी मारले गेले.विश्वासरावासारखा मुलगा मारला गेला.त्यामुळे तो अतिशय विचित्र मन:स्थितीत राहू लागला व सहा महिन्यातच त्याचा मृत्यू झाला.

५)रघूनाथरावांचा उदय : पानिपतच्या लढाईमध्ये भाऊसाहेब,विश्वासराव व अन्य मराठा सरदार मारले गेले व लवकरच बाळाजी बाजीरावाचाही मृत्यू झाला.त्यामुळे पेशवेपदाचा प्रश्न उद्भवला.पेशवे घराण्यात रघूनाथराव हाच वडील माणूस उरला होता.मात्र लोकमत त्याच्या विरोधात होते.त्याने मराठा राज्यात अंतर्गत दुही निर्माण केली व पुढे तर नारायणरावाचा खून करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.राघोबा दादाचा उदय मराठा राज्याचा हानीकारक ठरला.

६) उत्तरेतील मराठा सरदारांची हानी : पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला.या लढाईत अंताजी माणकेश्वर,जनकोजी शिंदे,दत्ताजी शिंदे,विश्वासराव,सदाशिवराव भाऊ,समशेर बहादूर,तुकोजी शिंदे,इब्राहिमखान गारदी यांचा अंत झाला.म्हणून मराठा सरदार शांत झाले.अनेक मराठा सरदार जबरदस्त जखमी झाले.

७) मराठ्यांचे स्वप्न भंगले : उत्तरेकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करणे आणि दिल्लीचे तख्त काबीज करणे हे मराठ्यांचे स्वप्न पानिपतच्या युद्धातील पराभवामुळे भग्न पावले.

८) फुटीरपणात वाढ : पानिपतच्या पराभवामुळे पेशव्यांचाही बळी गेला.त्यामुळे शिंदे,होळकर,पवार,गायकवाड हे मराठा सरदार स्वतंत्ररित्या वागू लागले.ते पेशव्यांची आज्ञाही मानीत नव्हते.

९) मोगल सत्तेवर आघात : पानिपतच्या लढाईनंतर दिल्लीच्या गादीवर नाममात्र मोगल बादशाह बसले.अब्दालीचा दिल्लीच्या राजकारणातील दरारा वाढला.अब्दालीच्या हूकूमानुसार मोगल बादशाह आपले धोरण आखू लागले.

१०) नजिबखानचा दिल्ली राजकारणात प्रवेश : अब्दालीला मोठी किंमत देऊन पानिपतचा विजय मिळाला होता.त्याला त्यात फायदा झाला नाही उलट तोटा झाल्यामुळे तो दिल्लीच्या भानगडीत पडला नाही.त्यामुळे नजिबखानाने दिद्दीची सत्ता बळकावली.

११) इतर सत्तांचा उदय : पानिपतच्या लढाईनंतर हिंदुस्थानात राजकीय पोकळी निर्माण झाली.त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सत्ता उदयास आल्या.पंजाबात शिखांची सत्ता स्थापन झाली.कर्नाटकात हैदरची सत्ता स्थापन झाली.इंग्रज सत्तेला आपला पाया रोवण्यास वाव मिळाला.

अशा प्रकारे पानिपतची लढाई हिंदुस्थानच्या इतिहासावर महत्वपुर्ण परिणाम घडवून आणणारी ठरली.याद्वारे मराठ्यांच्या सत्तेत परिवर्तन घडून आले.उत्तर हिदूस्थानात सत्तेची पोकळी निर्माण झाली.ही परिस्थिती ब्रिटिशांचे आगमन होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुकूल ठरली.पुढील काळात मराठ्यांनी आपले साम्राज्य पुन्हा स्थापन करण्याचा प्रयत्न केला असला तरी ,त्यांना पूर्वीप्रमाणे यश मिळू शकले नाही.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 6221 +22