पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार पर्यावरण प्रयोगशाळा कोण स्थापन करू शकते?www.marathihelp.com

पर्यावरण प्रयोगशाळा (Environmental Laboratory) :

पर्यावरण कायद्यांचे अवलंबन व अंमलबजावणी करीत असताना ‘पर्यावरण प्रयोगशाळा’ विशेष महत्त्वाची भूमिका बजावतात. पर्यावरण कायद्याच्या अंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे पर्यावरण प्रयोगशाळा स्थापन करता येतात किंवा यांच्यातर्फे पर्यावरण प्रयोगशाळा विनिर्दिष्ट/मान्यताप्राप्त घोषित करता येतात.

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६च्या कलम १२ अंतर्गत स्थापलेल्या किंवा विनिर्दिष्ट केलेल्या पर्यावरण प्रयोगशाळेत हवेचे, पाण्याचे, मातीचे किंवा इतर पदार्थांचे नमुने तपासून दिले जातात.

हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१च्या कलम १६, १७, २८ अंतर्गत स्थापलेल्या किंवा विनिर्दिष्ट केलेल्या हवा प्रयोगशाळेत हवेचे किंवा उत्सर्जित द्रव्याचे नमुने तपासून दिले जातात.

जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४च्या कलम १६, १७, ५१, ५२ अंतर्गत स्थापलेल्या किंवा विनिर्दिष्ट केलेल्या जल प्रयोगशाळेत पाणी, मलप्रवाह किंवा धंद्यातील सांडपाणी यांचे नमुने तपासून दिले जातात.

पर्यावरण प्रयोगशाळेत तपासावयाचे नमुने घेण्याचे तंत्र, कलम ११– पर्यावरण अधिनियम, १९८६; कलम २६– हवा अधिनियम, १९८१ आणि कलम २१– जल अधिनियम, १९७४ या अंतर्गत नमूद केलेले आहे. त्याचे काटेकोर पालन आवश्यक असते. पर्यावरण प्रयोगशाळेतील चाचणीसाठीची कार्यपद्धती सुद्धा पर्यावरण कायद्यांतर्गत नमूद केलेली असते. पर्यावरण कायद्यांतर्गत शासकीय विश्लेषकाची नियुक्ती केली जाते. पर्यावरण प्रयोगशाळेचा अहवाल शासकीय विश्लेषकाने स्वाक्षरीत करावयाचा असतो.

प्रदूषण करणारे उदयॊग, कारखाने, मलनिःसारणकेंद्र, सांडपाणी प्रकिया केंद्र यांना चालविण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे संमंतीपत्रक प्रदान करण्यात येते. संमंतीपत्रकामध्ये संबंधित प्रदूषकांची यादी त्याबाबतच्या मानकांसकट दिलेली असते.

पर्यावरण प्रयोगशाळेतर्फे सादर केलेल्या अहवालामधील प्रदूषकाच्या मूल्याची मानकाबरोबर तुलना करून ठोसपणे प्रदूषण सिद्ध करता येते. पर्यावरण कायद्यांखालील कोणत्याही कार्यवाहीत तथ्याचा पुरावा म्हणून पर्यावरण प्रयोगशाळेतील अहवालाचा वापर करता येतो.

संमंतीपत्रकधारकास प्रदान करण्यात आलेल्या संमंतीपत्रकात नमूद केलेल्या उत्सर्जित प्रदुषकांसाठी नमुने तपासून त्याची नोंद नोंदणी पुस्तकात ठेवावी लागते. अशाप्रकारच्या नोंदणीपुस्तकाचा रीतसर प्रतिपाळ करणे संमंतीपत्रक धारकासाठी बंधनकारक असते. नोंदणीपुस्तकात नोंदणी करण्यासाठी व त्यासाठीचे नमुने तपासण्यासाठी संमंतीपत्रकधारकास स्वतःची खाजगी पर्यावरण प्रयोगशाळा ठेवता येते. परंतु पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हेगारी न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी, पर्यावरण कायद्यांतर्गत स्थापलेल्या किंवा विनिर्दिष्ट केलेल्या प्रयोगशाळेचा, शासकीय विश्लेषकाने स्वाक्षरीत केलेला अहवालच ग्राह्य धरला जातो.

solved 5
पर्यावरण Tuesday 6th Dec 2022 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 4922 +22