पर्यावरण व्यवस्थापन म्हणजे काय?www.marathihelp.com

पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यावरणाच्या आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया ही पर्यावरण व्यवस्थापनाचे एक अंग असून यात नियोजन, विश्लेषण व मूल्यांकन यांच्या आधारे संसाधनांचा विचारपूर्वक उपयोग करण्याचे तंत्र वापरले जाते.

पर्यावरणाचे व्यवस्थापन विशिष्ट प्रदेश किंवा राष्ट्र यांच्याशी मर्यादित नसून ती संपूर्ण जगाची गरज आहे. भविष्यात मानवी समाजाच्या समन्यायक्षम उपयोगासाठी परिसंस्थांचे रक्षण करणे व परिसंस्थांतील अखंडत्व राखणे हे पर्यावरण व्यवस्थापनाचे ध्येय आहे.

पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे:
पर्यावरणातील निरनिराळ्या घटकांचे संशोधन करणे.
पर्यावरणाच्या नियोजनाची रूपरेषा तयार करणे.
पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त ठेवणे.
मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे.
अवक्षय होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे.
पर्यावरणाचा दर्जा राखला जावा म्हणून विशिष्ट नियमावली वा तत्त्वे ठरविणे. प्रदूषण नियंत्रणाद्वारे पर्यावरणाच्या गुणवत्तेचे रक्षण करणे.
व्यवस्थापनासाठी उपायांचे समीक्षण करणे व त्यात सुधारणा करणे.
व्यवस्थापनासाठी नियोजित केलेल्या उपायांच्या परिणामांची तपासणी करणे.
पर्यावरण व्यवस्थापनासाठी साहित्यसंग्रह करणे.
पर्यावरण शिक्षण देण्याची व्यवस्था करणे आणि समाजात जाणीव व जागृती निर्माण करणे.
संसाधनांचा बहुउद्देशीय वापर करून पारिस्थितिकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न करणे.
जैवविविधतेचे परिरक्षण करणे.
स्वच्छ तंत्रज्ञान उत्पादन संकल्पना स्वीकारणे.
पर्यावरण संधारणासाठी नियम व कायदे करून त्यांची अंमलबजावणी करणे.

पर्यावरण व्यवस्थापनाचे धोरण:
हे ठरविताना खालील घटकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.
पर्यावरणीय अवनती टाळण्यासाठी हवा प्रदूषण, जलप्रदूषण व भूमिप्रदूषण यांवर प्रभावीपणे नियंत्रण आणणे व कार्यक्षम उपाय योजणे.
ऊर्जा संसाधनांसह इतर सर्व संसाधनांचा अतिवापर टाळणे व टाकाऊ पदार्थांची कमीत कमी निर्मिती व्हावी यासाठी कमी खर्चिक परंतु कार्यक्षम तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे.
शाश्वत विकासासाठी उत्पादन निर्मितीकरिता स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करणे.
शाश्वत विकासासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन तपासणी, पर्यावरण व्यवस्थापन पद्धती, पर्यावरण जोखीम मूल्यमापन इत्यादी साधनांचा स्वीकार करणे.
व्यापक स्तरावर पर्यावरणीय जगजागृती व्हावी यासाठी प्रोत्साहन देणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण समस्यांची समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे.
शैक्षणिक स्तरावर पर्यावरण शिक्षण व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे.
लोकसंख्या वाढीस प्रतिबंध व्हावा यासाठी योजना आखणे.
सामाजिक समन्याय व्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणे.

पर्यावरणाच्या प्रमुख घटकांचे व्यवस्थापन:
पर्यावरण हे जैविक तसेच अजैविक घटकांपासून बनलेले असते. असे व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. पर्यावरणातील काही प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत :
वन व्यवस्थापन,
वन्यजीव व्यवस्थापन,
मृदा व्यवस्थापन,
जल संसाधनांचे व्यवस्थापन,
खनिज संसाधनांचे व्यवस्थापन,
ऊर्जा संसाधनांचे व्यवस्थापन.

याशिवाय पर्यावरण व्यवस्थापनात प्रदूषण नियंत्रित करण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. यास प्रदूषण नियंत्रण व्यवस्थापन असेही म्हणतात. यात
(अ) वायुप्रदूषण नियंत्रण उपाय,
(आ) मृदाप्रदूषण नियंत्रण उपाय,
(इ) जलप्रदूषण नियंत्रण उपाय आणि
(ई) अपशिष्ट पदार्थांचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो.

solved 5
पर्यावरण Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1037 +22