छंदाचे प्रकार किती?www.marathihelp.com

छंदाचे प्रकार किती?

छंदाचे प्रकार :साधारणतः छंद हे चार प्रकारांत विभागता येतात : (१) वस्तू जमविण्याचा व प्राणी पाळण्याचा छंद, (२) वस्तू स्वतःच तयार करण्याचा छंद, (३) कलाकौशल्याची कामे व (४) खेळ आणि व्यायाम.

(१) वस्तू जमविण्याचा व प्राणी पाळण्याचा छंद : पोस्टाची तिकिटे किंवा स्वाक्षऱ्या जमविणे, ग्रंथसंग्रह करणे, निरनिराळ्या चित्रविचित्र वस्तूंचा संग्रह करणे (उदा., ऐतिहासिक वस्तू, चित्रे, फुलपाखरे, काचा, दिवे, खेळ, खेळणी इ.), कुत्रा, मांजर, कबुतरे, पोपट, ससे, हरिण यांसारखे पशुपक्षी पाळणे याच प्रकारात येतात.

(२) स्वतः वस्तू तयार करणे :आपले हस्तकौशल्य वापरून काही आवडत्या वस्तू स्वतःच तयार करण्याची हौस असली, तर तीमधून करमणूक होते आणि मनाला विरंगुळा मिळतो. आपण तयार केलेली वस्तू स्वतः वापरण्याचे मानसिक समाधान काही वेगळेच असते. वस्तू तयार कशा कराव्यात, त्या तयार करताना बाजारातील नवी साधनसामग्री न आणता घरातील जुनी सामग्री कशी वापरावी, जोड कसे तयार करावेत, तयार वस्तू आकर्षक कशा कराव्यात इत्यादींचे मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तके बाजारात मिळतात. कपाट, टेबल, खुर्ची असे उपयोगी फर्निचर तयार करणे, विणकाम-शिवणकाम करणे, रंगरंगोटी करणे, चित्रे काढणे, घरातील दिवे बसविणे वा ते दुरुस्त करणे, घरातील किरकोळ दुरुस्त्या करणे, विटकाम करणे इ. अनेक छंद या प्रकारात मोडतात.

(३) कलाकौशल्याचे छंद :नृत्य, संगीत, चित्रकला यांसारख्या कलाप्रकारांची हौसेने साधना करणे या प्रकारात मोडते. नाट्यनिर्मिती किंवा नाटकातून कामे करणे हेदेखील हौसेचे छंद ठरतात. अशा प्रकारचा छंद असल्यामुळे माणसातील सुप्त शक्तींना वाव मिळतो त्याचप्रमाणे तो इतरांची करमणूकही करू शकतो.

(४) खेळ आणि व्यायाम :या प्रकारात मोकळ्या वातावरणाचा लाभ होतो, तसेच प्रत्यक्ष कृतीला वाव मिळतो. बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट, गोल्फ, मासे पकडणे, शिकार करणे, पोहणे इ. खेळ लोकप्रिय आहेत. काही लोकांना पत्ते, कॅरम यांसारखे बैठे व टेबल टेनिससारखे अंतर्गेही खेळ आवडतात.


छंदाची निवड :

आपल्या आवडीनिवडींप्रमाणे आणि मानसिक कलाप्रमाणे छंदांची निवड करावी हे खरे असले, तरी बैठी व एकाच जागेवर कामे करणारांनी जर मैदानी व मोकळ्या हवेतील छंद लावून घेतले, तर ते हितकारक होते. एकलकोंड्या स्थितीत ज्याला बराच काळ घालवावा लागतो, त्याने चारचौघांचा सहवास देणारा छंद लावून घेतला, तर ते त्याला लाभदायक होते. याच्या उलट अनेकांच्या संगतीत आणि संबंधात काम करावे लागणाराने मन शांत होईल व गडबडीपासून दूर जाता येईल, असे वाचनाचे, लेखनाचे, संग्रहाचे छंद लावून घेणे लाभदायक असते.

आपल्या भोवतालच्या परिस्थितीप्रमाणेच छंद निवडण्याकडे माणसाचा कल असतोच असे नाही. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्याला समुद्र काठी सापडणाऱ्या शंखशिंपल्यांचे महत्त्व वाटत नाही. समुद्र क्वचित पहावयास मिळणाऱ्याला सागरकिनारी मिळणाऱ्या वस्तूंचा संग्रह करण्याची मौज वाटते.

छंदांची हौस पुरविण्यासाठी पुरेशी सवड, जरूर तो पैसा त्याचप्रमाणे जरूर ते श्रम करण्याची तयारी असावी लागते. 

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 3932 +22